- निवडणुक विभागाकडूनही अद्याप कोणत्याच सूचना नाहीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- कोरोनामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवकांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवरील पोटनिवडणक लांबणीवर गेली आहे. सर्वसाधारण परिस्थितीत पोटनिवडणूक सहा महिन्याच्या आत घेतली जाते. त्यानुसार डिसेंबरअखेर निवडणूक होणे अपेक्षित होते. पण कोरोनामुळे निवडणूक झाली नाही.
आता राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये मनुष्यबळ व पोलिस यंत्रणा गुंतल्याने मार्च महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ चिखलीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले दत्ता साने, प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी प्रभागातून राष्ट्रवादीकडून निवडून आलेले जावेद शेख, प्रभाग क्रमांक चार दिघी – बोपखेलमधून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. नगरसेवकांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
नगरसेवकांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला कळविली आहे. निवडणुकीबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत, अशी माहिती पालिकेचे अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.