- समस्या सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल – तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तिरोडा (दि. १३ डिसें.) :- तिरोडा विधानसभेतील अदानी प्रकल्प बाधित मेंदीपुर व परिसरातील गावांच्या समस्यांचे निवारण करण्याबाबत शिवसेना तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी ठाणेगाव व सुकडी डाच्या ग्रामस्थांची बैठक घेतली आहे. ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
यावेळी संघटक देवेंद्र चौधरी, उपसरपंच साहेबराव कानुपटले, शाखाप्रमुख राधेशाम फुलचंद राहंडाले, धरमदास चौधरी, ताराचंद माधव तुम्हसरे आदी उपस्थित होते.
मेंदीपुर गावाची ९० टक्के शेतजमीन ही अदानी कंपनी ने अधिग्रहित केलेली आहे. अदानीमुळे मेंदीपुर गावात समस्यांचे माहेरघर निर्माण झाले असून, त्याकडे अदानीने परस्पर दुर्लक्ष केले आहे. येथील अनेक युवावर्ग बेरोजगार असून, अजून पावतो, अदानी ने रोजगार उपल्बध करून दिलेला नाही. मेंदीपुर गावात अदानीची धूळ येते. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मेंदीपुरकडून गुमाधावडा व काचेवाणी गावात जाणारा मार्ग बंद झाला असून, जाण्या-येण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. मेंदीपुर गावातील जनावरांची चरण्याच्या जमिनीवर अदानीने अतिक्रमण केले असून, जनावरांची भूक भागविण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही.
मेंदीपुर तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तसेच, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनास अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु, अद्यापपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २१ दिवसांच्या आत ग्रामस्थांची बैठक घ्यावी व ग्रामस्थांच्या अडचणींचे निराकरण करावे. अन्यथा, शिवसेना स्टाईलने ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशारा युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.












