- मग आमच्यावर अन्याय का?..
- आवास योजनेत अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांचा टाहो…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी. २०२१) :- पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर मिळावे यासाठी पात्र लाभार्थी म्हणून ज्यांनी फॉर्म भरले अशांची संख्या ४७ हजार ८०१ एवढी असून यापूर्वी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आवास योजनेमध्ये वेटिंग वरील पात्र लाभार्थी ६७२० एवढे वेटींगवरती प्रतीक्षा यादीत आहेत. या सर्वांना घरकुल मिळावे, अशी मागणी या योजनेतील फॉर्म भरलेल्या लाभार्थ्यांनी केली आहे.
घरकुलच्या प्रश्नांवरती राजकारण न करता ज्यांनी ज्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरले त्या सर्वांना घरकुल मिळावेत, अशी मागणी देखील या लाभार्थ्यांनी केली आहे. रामकृष्ण मोरे सभागृह येथे घरकुल धारकांचा लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी याठिकाणी एकत्र आले होते.
आम्ही कर्ज काढून, सोनं गहाण ठेवून, गळ्यातील मणी मंगळसूत्र घाण ठेवून घरकुलसाठी पाच हजार रुपये भरले आहेत. आता फक्त लकी ड्रॉद्वारे तीन हजार ६६४ लोकांना घरकुल दिले जाणार आहे. मग उर्वरित लाभार्थ्यांनी काय करायचे असा प्रश्न यावेळी लाभार्थ्यांनी उपस्थित केला. आम्हाला जर घर द्यायचे नव्हते तर मग आमचे पाच हजार रुपये का भरून घेतले, असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला. काही महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. आम्हाला भाडे भरावे लागत आहे. कोरोनामुळे आमचा व्यवसाय बंद होता. मोलमजुरी बंद होती. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला घरात राहणे देखील मुश्किल झालं होतं. यात जगायचं कसं आणि भाडे कुठून भरायचे? असा प्रश्न निर्माण झाला होता. कसाबसा आम्ही उपजीविका चालवत असून आता मात्र आम्ही भाडे भरू शकत नाही. यामुळे आम्हाला हक्काचे आणि स्वतःचे घर मिळाले पाहिजे, अशी मागणी आमची आहे. आमची मागणी पूर्ण करावी असे यावेळी महिलांनी सांगितले.
घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.


















