न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १५ डिसें.) :- भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये कै. लक्ष्मीबाई तापकीर यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन साई मल्हार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मल्हारी तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.
कै. लक्ष्मीबाई तापकीर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त काळेवाडीतील तापकीरनगर येथील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत सालाबादप्रमाणे बुधवार (दि. १२ ते १४ डिसें.) या कालावधीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरीता चित्रकला, वकृत्व, निबंध, गायन यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कला क्षेत्राची आवड व्हावी यासाठी, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात बालवर्ग ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा तर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे काढून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळावी व त्यांच्यात विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी समाज जागृती तसेच ‘आई’ या विषयावर निबंध लिहून त्यांचे विचार प्रकट केले. रितेश चौधरी या विद्यार्थ्याने गायलेल्या ‘आई’ या कवितेवर उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार (दि. १४) रोजी सकाळी कै. लक्ष्मीबाई तापकीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, वकृत्व स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यात रूपाली खोत, आदित्य जाधव, प्रगती जाधवर, आकांक्षा इप्पर, भूषण धुप्पे या विद्यार्थ्यांनी विविध विविध विषयांवर भाषणे केली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील सभाधीटपणा, मुद्देसूद मांडणी व भाषाशैली यांची चूणुक दाखवून दिली.
परीक्षक म्हणून शाळेतील शिक्षिका उल्का जगदाळे यांनी परीक्षण केले. शाळेतील विद्यार्थिनी अस्मिता अवचार हिच्या सुमधूर गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अभिवादन कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भटकर यांनी केले तर सर्व उपस्थित पाहुण्यांचे व पालकांचे आभार शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी मानले.












