- प्रेमसंबंधातून घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलसमोर असलेल्या वस्तीमध्ये राहणारी एक मुलगी सकाळी अकराच्या सुमारास कामावर जात होती. त्यावेळी पाठिमागून आलेल्या तरुणाने मुलीला पिस्तूलाचा धाक दाखवून दुचाकीवरुन पळवून नेले.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करीत आरोपीला ताब्यात घेतले. शंतनू चिंचवडे (वय २५. रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.
युवती सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यास निघाली होती. त्या वेळी आरोपीने बंदुकीच्या धाकाने तिला दुचाकीवर बसविले. काही नागरिकांनी त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेत आरोपीला पकडले. संबंधित युवतीशी आरोपीचे पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांच्यातील नात्यात फारकत आल्याने आरोपीने अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.