- महापालिकेच्या ‘देर आये दुरुस्त आये’ कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) व बँक हमी सादर करणे आवश्यक असते. यात काही जणांनी बनावट एफडीआर सादर करून कंत्राट मिळविले. बनावट एफडीआरप्रकरणी अखेरीस पिंपरी चिंचवड महापालिकेला जाग आली असून १८ पैकी पाच ठेकेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. त्याबाबत पोलिसांना तसे पत्र दिले होते. मात्र, प्रशासनाकडून तक्रारकर्ता म्हणून कोणीही पुढे न आल्याने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.
गुन्हे दाखल ठेकेदार पाटील अँड असोसिएटचे मालक सुजित सूर्यकांत पाटील (वय २६, कार्यालय जयगणेश साम्राज्य, भोसरी), कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कुर्हाडे (वय २९, रा. नेहरुनगर), एस बी सवईचे मालक संजय बबन सवई (रा. जयमल्हारनगर, थेरगाव, चिंचवड), वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय ४७, रा. सुशिाल अपार्टमेंट, भोसरी), डी़ डी़ कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी (वय २८, रा. सुपर प्लाझा, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पालिकेच्या कर्मचार्यांनी फिर्याद दिली आहे. सुजित पाटील यांनी ५ कामे घेतली होती. त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक आळंदी शाखेकडील एफडीआर/ बँक गॅरेंटी दिली होती. ती बनावट असल्याचे आढळून आले. कृती कन्स्ट्रक्शनचे विशाल कुर्हाडे यांनी ४ कामे घेतली होती. त्यांची ठाणे जनता सहकारी बँकेची बँक गॅरेंटी बनावट निघाली आहे. एस बी सवईचे मालक संजय सवई यांनी ७ कामे घेतली होती. त्यांनीही ठाणे जनता बँकेच्या आळंदी शाखेची बँक गॅरेंटी बनावट निघाली आहे. दयानंद मळगे यांनी १२ कामे घेतली होती. त्यांनी बँक आॅफ महाराष्ट्र, राजगुरुनगर शाखा व पंजाब नॅशनल बँक नाना पेठ यांची बनावट बँक गॅरेंटी दिली होती. दिनेश नवानी यांनी तब्बल २४ कामे घेतली होती. त्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँक, नाना पेठेची बनावट बँक गॅरेंटी दिली होती. याबाबत आता पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
















