न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे / पिंपरी (दि. १७ डिसें.) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुणे मेट्रोच्या तिस-या मार्गिकेचे श्री. शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे मंगळवार (दि. १८) रोजी सायं ४. ४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या फेज तीनचे भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील वाहतूक मार्ग व पार्किंग व्यवस्थेत वाहतूक पोलिसांनी बदल केलेले आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे मेट्रोच्या तिस-या मार्गिकेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांनी साडेतीन पर्यंत कार्यक्रम स्थळी पोहोचण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अति महत्वाच्या आणि महत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी हॉटेल ऑर्चीड पार्किग मेन गेट मधून प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहने पार्क करून चालत कार्यक्रम स्थळी येणार आहेत. इतर नागरिक व हिंजवडी येथील इंजिनिअर्ससाठी महाराजा गेट येथून प्रवेश देण्यात आला आहे. तर ज्यांनी चार चाकी वाहने आणली आहेत. त्यांना हॉटेल हॉलिडे इन येथे चारचाकी पार्क करून कार्यक्रमस्थळापर्यंत चालत यावे लागणार आहे. तसेच बसमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी महाराजा गेट येथे उतरुन कार्यक्रमस्थळी चालत जावे लागणार आहे, असे पोलिसांनी कळविले आहे.












