- शहरातील साडेपाच लाख मिळकतधारकांना आयुक्तांचा दणका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- शहरातील २००५ पूर्वीच्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यात वाढ करण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या अधिकारात हा निर्णय घेतला असून आगामी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्याचा थेट फटका शहरातील जुन्या व नव्या साडेपाच लाख मिळकतधारकांना बसणार आहे.
सन २००५ पूर्वीच्या मिळकतींना दुपटीने तर, सन २००६ नंतरच्या सर्व मिळकतीच्या करदरात ५ टक्के वाढ होणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण ८ कराधिन नियम ७ मधील तरतुदीनुसार आयुक्तांना निवासी, बिगरनिवासी व इतर मिळकतींच्या प्रतिचौरस फुटांचे करयोग्य मूल्य दर ठरविण्याचे अधिकार आहेत.
त्यानुसार आगामी २०२१-२२ वर्षासाठी प्रतिचौरस दरात वाढीचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. वर्षभरानंतर पालिकेची निवडणूक असल्याने नगरसेवकांनी कोणतीही करवाढ केली नाही. मात्र, आयुक्तांनी करमूल्य दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ अवलोकनार्थ तो प्रस्ताव स्थायी समितीसमोर आहे. स्थायी समिती तसेच, सर्वसाधारण सभेने प्रस्ताव फेटाळला तरी, ती वाढीव दरवाढ १ एप्रिलपासून सर्व मिळकतीवर लागू होणार आहे.















