- नोटीसा देऊनही कर न भरलेल्या तीन मिळकतींवर जप्तीची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मिळकतधारकांची थकबाकी आहे त्यांच्यावर महापालिका जप्तीची कारवाई करत आहे. शहरातील ३२५ मिळकतधारकांना थकविल्यामुळे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर न भरलेल्या तीन मिळकतींवर कारवाई करण्यात आली.
चऱ्होली करसंकलन कार्यालयाच्या हद्दीतील बसवंत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे भीमराव बसवंतराव पाटील यांच्या मोकळ्या जमिनीवर ५२ लाख ५५ हजार रुपये थकबाकी होती. तसेच औद्योगिक मिळकत करापोटी ५५ लाख ७४ हजार अशी एकूण १ कोटी ८ लाख २९ हजार ८५३ थकबाकी होती. निगडी प्राधिकरण कार्यक्षेत्रातील गुलशन हॉटेल (तालेरा फोर्ड) या मिळकतीची एकूण रक्कम ५७ लाख ५५ हजार ७५६ रुपये भरणा न केल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये ई क्षेत्रीय अधिकारी अवधूत तावडे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, संजय लांडगे, लक्ष्मण काळे, अतिक्रमण निरीक्षक प्रकाश बाणेकर, बाळू गंधट, राहुल जगताप, संतोष बांदल, भास्कर खंडे, दत्तात्रय कोळसे, श्रीराम भागवत व कैलास कदम यांनी काम पाहिले. करसंकलन विभागातर्फे ५ लाखांपुढील थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना मिळकत जप्ती पूर्व नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. नोटीस मिळूनही कराचा भरणा न करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.


















