- शहरातील ३०० पेक्षा अधिक जणांवर पोलिसांत गुन्हे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशा बांधकामांवर कारवाईस न्यायालयाने रविवार (दि. ३१) पर्यंत तात्पुरती स्थगिती दिली होती. ती मुदत संपल्याने पालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे पत्राशेडवर कारवाई सुरू केली जाणार आहे.
त्यासाठी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने पूर्वतयारी केली आहे. कोरोना महामारीमुळे मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर तात्पुरती स्थगिती आदेश २२ डिसेंबर २०२० पर्यंत नंतर ३१ जानेवारीपर्यंत दिली होती. त्याचा गैरफायदा घेत शहरातील अनेक भागात अधिकृत बांधकामे जोरात सुरू आहे.
महिना दोन महिन्यात दोन ते तीन मजली इमारती बांधल्या जात आहेत. अनेक ठिकाणी पत्राशेड बांधली गेली आहेत. तसेच, प्लॉटींग करून जागा विकल्या जात आहेत. त्यामुळे शहर बकाल होत आहे. त्याचबरोबर अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. या संदर्भात पालिकेकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, न्यायालयीन स्थगिती असल्याने पालिकेने कारवाई बंद ठेवली होती मात्र, पालिकेने ३०० पेक्षा अधिक जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे.
न्यायालयाचा स्थगितीची मुदत संपल्याने पालिकेच्या बांधकाम अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी यंत्रसामुग्रीसह मनुष्यबळ सज्ज ठेवले आहे. पोलिस बंदोबस्तात पूर्वीप्रमाणे कारवाई सुरू केली जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. विशेषत: आरक्षण, रेड झोन, वाणिज्य वापर आणि इतर जागेवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले आहे. कारवाईसाठी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग सज्ज असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांनी सांगितले.















