- सत्ताधारी भाजपकडून आता केंद्रीय मंत्र्यांना सोडतीसाठी आवतनं..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- राजशिष्टाचाराच्या वादात महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेचा नियोजित सोडत कार्यक्रम रद्द करण्यात आला. श्रेयवादासाठी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घातलेल्या या वादात सर्वसामान्य अर्जदारांची घोर निराशा झाली. हा श्रेयवादाचे गु-हाळ आणखी थांबण्याचे नाव घेत नसून, सत्ताधारी भाजपने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सोडत काढण्याची तयारी केली आहे. त्यांची तारीख मिळताच कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ११ जानेवारीला रावेत, च-होली व बो-हाडेवाडी येथील ३६६४ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमासाठी बोलवताना राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. ही सोडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काढण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ऐनवेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यक्रम रद्द करण्याची भूमिका घेतली.
या गोंधळात सर्वसामान्य अर्जदारांची मोठी निराशा झाली. त्यांनी पालिका, भाजप व राष्ट्रवादीचा उध्दार करीत शिव्यांची लाखोटी वाहली. दरम्यान, त्या नंतर श्रेयवाद बाजूला ठेवून राजशिष्टाचाराचे पालन करून लवकरच सोडत होईल, अशी अपेक्षा होती. श्रेयवादाची ही लढाई आणखी काही थांबलेली नाही. सत्ताधारी भाजपने आता राष्ट्रवादीचा डाव त्यांच्यावर उलटविण्याची तयारी केली आहे. भाजपकडून महापौर उषा ढोरे यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना निमंत्रित करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. त्यांची तारीख घेऊन लवकरच हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू आहे.
वेळ मिळताच सोडतीचा कार्यक्रम पंतप्रधान योजना सोडत कार्यक्रम या महिन्यात घेण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू असून राजशिष्टाचाराप्रमाणे केंद्र व राज्य शासनातील पदाधिकारी यांची वेळ घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तारीख मिळताच कार्यक्रम घेतला जाईल, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.
















