न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांसाठी लवकर निदान व लवकर उपचार प्रकल्प राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली ठरली आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचाराचे महत्त्व आणि बालवाडी ताईची भूमिका त्यांची कार्यपध्दती या विषयावर बालवाडी ताईसाठी कार्यशाळेचे आयोजन दि.१०/०२/२०२१ रोजी
आचार्य आत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर ,पिंपरी, पुणे येथे करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते नामदेव ढाके तज्ञ सल्लागार समीर घोष, उप आयुक्त अजय चारठाणकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कार्गांतीवर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. विषय तज्ञ म्हणून डॉ.कल्याणी मांडके यांनी सदरील प्रकल्प केरळ व
तमिळनाडू या सारख्या राज्यांनी यापूर्वीच सुरू केला असून महाराष्ट्रामध्येपहिलीच महानगरपालिका असल्याने अभिनंदन करायला हवे असे सांगितले. यावेळी त्यांनी दिव्यांग बालक व त्यांच्या विकासात्मक प्रक्रियेत बालवाडी ताईची भूमिका या विषयावर प्रकाश टाकला.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समाज कल्याण विकास आदी शब्दांच्या पलीकडे जाऊन न्याय भूमिकेतून दिव्यांगांसाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले. या वेळी विषय तज्ञ शालिनी सिंग यांनी बालवाडी स्तरावरील अंमलबजावणी प्रक्रिया विषद केली त्यांना मनीषा परब यांना सहकार्य केले. दिव्यांग सल्लागार समीर घोष यांनी बालवाडी स्तरावर लवकर निदान व लवकर उपचार हा प्रकल्प राबवून आपले वेगळे वैशिष्ठ महापालिका निर्माण करत असल्याचे सांगितले.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, नाविन्यपूर्व व लोकहिताचे प्रकल्प राबविण्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका अग्रेसर आहे. दिव्यांगांसाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच महानगरपालिका असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. या प्रसंगी समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, प्रहार संघटनेचे दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, मनिता पाटील, भाग्यश्री मोरे, रविंद्र झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता मालपाठक, अशोक सोळंके, जोशी इ. परिश्रम घेतले. यावेळी मोठया संख्येने बालवाडीताई उपस्थित होत्या.


















