न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. १९ डिसें.) :- पुणे-नाशिकदरम्यान देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वेमार्गाची उभारणी होणार आहे. ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ तथा ‘महारेल’ कंपनीने या रेल्वेमार्गाची नव्याने आखणी केली आहे. नवीन मार्ग २२० किलोमीटरचा असून, पुणे ते नाशिक प्रवास दोन तासांत पार करता येणार आहे. या प्रकल्पाचे अंतिम सर्वेक्षण १५ ते २० दिवसांत रेल्वे बोर्डाला सादर होईल. फेब्रुवारीदरम्यान प्रत्यक्ष कामाला म्हणजे भूसंपादन निविदांची कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिली. निविदाप्रक्रियेनंतर तीन वर्षांत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी मी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहे. २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त भागीदारीतून प्रकल्प उभारण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी ५० कोटी रुपये या कंपनीला हस्तांतरित केले आहेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. जुना मार्ग २५४ किलोमीटर होता. आता नवा मार्ग २२० किलोमीटरचा आहे. हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ट्रॅकसाठी सात हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील प्रत्येकी १५०० कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारचे असतील, तर उर्वरित चार हजार ५०० कोटी रुपये वित्तीय संस्था आणि बँकांकडून कर्ज स्वरूपात उभे केले जाणार आहेत, असे आढळराव-पाटील यांनी सांगितले.
नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणाचे काम ड्रोनद्वारे सुरू असून, १८० कि.मी.चे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण येत्या १५ दिवसांत पूर्ण करून त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला तांत्रिक मान्यतेसाठी सादर होणार आहे. बोर्डाने यापूर्वीच प्रकल्पाला मान्यता दिली असून, अर्थसंकल्पात ‘ऑलिम्पिक बुक’मध्ये प्रथम पसंतीच्या क्रमांक १ वर हा प्रकल्प घेण्यात आल्याचे सांगून आढळराव-पाटील म्हणाले, हिंदुस्थानातील हायस्पीड रेल्वेचा हा पहिलाच प्रकल्प आहे. २२० किलोमीटरचे हे अंतर अवघ्या दोन तासांत गाठता येणार आहे. ‘महारेल’ची कार्यालये पुणे आणि नाशिक येथे सुरू केली जाणार आहेत.
पुणे ते नाशिक दरम्यानच्या प्रवासी औद्योगिक आणि शेतमालाच्या वाहतुकीला या प्रकल्पामुळे चालना मिळेल. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील १३०० एकर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
असा असेल नवा मार्ग
पुणे, हडपसर, वाघोली, कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, सिन्नर, शिंदे आणि नाशिक अशी एकूण २१ रेल्वे स्थानके या मार्गावर असणार आहेत.