- नाना काटेंची आयुक्तांकडे मागणी..
- सांगली पॅटर्नला मिळतेय पुष्टी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत उद्या शुक्रवारी ५ मार्च रोजी होणारी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रियेत आवाजी मतदान ऐवजी गुप्त मतदानाद्वारे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याने शहरात पुन्हा “सांगली पॅटर्न”ची चर्चा सुरू झाली आहे.
काटे यांनी म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या कारभाराच्या मनमानी राजकारणाला त्याचे नगरसेवक पुरते वैतागले आहेत. उद्या होणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करणार आहेत. परंतु, आवाजी मतदान प्रक्रियेमुळे ते धास्तावले आहेत. त्यांना सांगली पॅटर्न घटनेमुळे स्वतःच्या नगरसेवकांवर विश्वास राहिला नाही.
जर गुप्त मतदान घेतले तर खात्रीशीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बहुमत मिळणार आहे आणि हीच भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळे स्थायीच्या विद्यमान सदस्यांना “कारभारी” शपथ देऊन बांधून घेण्याचा कुटील डाव नेतेंडळीं करत असल्याची चर्चा आहे. आपल्या सदस्यांवर असा अविश्वास दाखवून भाजप नेते सदस्यांचा अपमान करत आहेत, याचा प्रचंड संताप स्थायी सदस्य खाजगीत व्यक्त करत आहेत. त्यामुळे शहराच्या राजकारणात नवा भूकंप होणार का याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे.
२०१७ ला महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यानंतर स्थानिक नगरसेवक व निष्ठावंत नगासेवकाना मोठ्या पदाची अपेक्षा होती. मात्र एकट्या भोसरी विधानसभा मतदारसंघात २ महापौर, पक्षनेते व ३ स्थायी समिती अध्यक्षपद दिल्यानंतर चौथ्यांदा भोसरी विधानसभेला स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नितीन लांडगे यांना संधी दिली. यामुळे सत्ताधारी भाजपच्या पिंपरी व चिंचवड विधानसभेतील नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील स्थायी समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत.
रवी लांडगे यांची नाराजगी, भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला सांगली पॅटर्नचा दाव्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातच नाना काटे यांच्या मागणीनुसार गुप्त मतदान झाले तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.