- योजना कार्यान्वित करा; अन्यथा आ. जगतापांच्या नेतृत्वाखाली आंदोलन..
- बांधकाम कामगार सेनेचा कामगार उपायुक्तांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- गेल्या वर्षभरापासून लॉकाडाऊनच्या अनुषंगाने शहरातील विविध कामगार नाक्यावर सुरू असलेली अटल आहार योजना ही बंद करणेत आली आहे. सध्या लाकडाऊनचा काळ संपुन आठ महिने झाले आहेत. तसेच दैनंदिन जीवन व आर्थिक व्यवहार हे पुर्ण क्षमतेने चालु आहेत. अशा वेळेस या नाका कामगारांना या योजनेपासून वंचीत ठेवणे योग्य ठरणार नाही.
संघटनेमार्फत वारंवार अर्ज व विनंत्या करून मंडळाकडे अटल आहार योजना पुन्हा कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न केले. पण, पुणे उपायुक्त कार्यालयातून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. उपायुक्त कार्यालयातील कुठल्याही अधिका-याकडून आजपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
नाका कामगार हे सन २०१८ पासून मंडळाकडे नोंदीत कामगार आहेत. तसेच या सर्व कामगारांना अटल आहार योजनेचे स्मार्ट कार्ड सुद्धा मिळालेले आहे. हे सर्व कामगार मंडळाकडे भीक मागत नाहीत. महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सध्याच्या घडीला १० हजार कोटींच्या जवळपास उपकर जमा आहे. या कामगारांच्या कल्याणकारी योजनासाठी तो वापरावयाचा आहे. सध्याच्या स्थितीमध्ये योजना पुन्हा कार्यान्वीत केल्यास या सर्व नाका कामगारांची २ वेळेच्या जेवणाची सोय होईल. तसेच हे सर्व कामगार कोरोनाने मरण्याआधी भूकेने मरणार नाहीत.
अन्यथा या अन्याया विरोधात येत्या गुरुवारी (दि. ०८) रोजीपासून बांधकाम कामगार सेनेच्या वतीने पुणे शहरातील विविध कामगार नाक्यावरील बांधकाम कामगारांना सोबत घेवून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे कामगार उपायुक्त कार्यालयात उपोषण करणार. हे उपोषण शांततापुर्वक मार्गानीच होईल, याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ. पण तरीही काही गंभीर परिस्थिती उदभवली तर त्याची पुर्ण जबाबदारी ही कामगार मंडळाचीच असेल, असा इशारा बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी निवेदनाद्वारे कामगार उपायुक्तांना दिला आहे.
















