- सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२१) :- कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अंशता लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मधून चष्म्याच्या दुकानांना दुकाने सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा सुधारीत आदेश पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.
ऑप्टीकल ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे या चष्मे विक्री करणा-या संस्थेचे सचिव देवानंद लाहोरे आणि प्रतिनिधींनी ९ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना भेटून दुकाने सुरु ठेवण्याची मागणी करणारे पत्र दिले होते.
आता चष्म्याची दुकाने नविन आदेशास अधिन राहून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा आदेश ३० एप्रिल २०२१ पर्यंत लागू असल्याचेही आदेशात अनुक्रमांक ७ मध्ये नमूद केले आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.