- आर्थिक बाबींशिवाय अन्य महत्वाच्या विभागांची डॉ. गोफणेंवर जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२१) :- कोरोना विषयक कामकाज शीघ्र गतीने व्हावे यासाठी आयुक्त राजश पाटील यांनी वैद्यकीय, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप केले आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडील महत्त्वाचे कामकाज काढून त्यांच्याकडे समन्वय, पर्यवेक्षण व पत्रव्यवहार ही जबाबदारी दिली आहे.
सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे वैद्यकीय विभागप्रमुख म्हणून तर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आरोग्य विभागासह कोरोना वॉररूमची जबाबदारी दिली आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांच्याकडे महापालिकेची कोविड केअर सेंटर, ऑटो क्लस्टर, जम्बो हॉस्पिटल पर्यवेक्षण, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संपर्क, पत्रव्यवहार, कोविड कामकाज समन्वय जबाबदारी दिली आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आरोग्य विभागाचे कामकाज कायम ठेवून कोरोना वॉररूमच्या कामकाजात समन्वय ठेवणे, कोविड विषयक कामकाज सोपवले आहे. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे वैद्यकीय विभागामार्फत (वैद्यकीय मुख्य कार्यालय, मध्यवर्ती औषध भांडार व मध्यवर्ती साहित्य भांडार या विभागासह) करण्यात येणारे निविदाविषयक कामकाज, सर्व प्रकारची बिले अदायगीचे कामकाज, हॉस्पिटल रजिस्ट्रेशनविषयक कामकाज वैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व रुग्णालये, दवाखाने (वायसीएमएच वगळून) यांचे आस्थापना, प्रशासकीय कामकाज, वैद्यकीय विभागासाठी मानधनावरील मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे कामकाज दिले आहे.
वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे यांच्याकडे शहरातील कोविड लसीकरण केंद्रे, कोरोना तपासणीप्रमुख म्हणून कामकाज, कोविड विषयक अहवाल शासनास पाठविण्याची जबाबदारी असेल. डॉ.लक्ष्मण गोफणे वैद्यकीय विभागाचे विभागप्रमुख असतील. डॉ. पवन साळवे आणि डॉ. अनिल रॉय यांना सोपविण्यात आलेल्या कामकाजासाठी कोणतेही वित्तीय अधिकार नसतील. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामकाजाचा अहवाल अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना वेळोवेळी सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.