- जेष्ठ समाजसेवक व श्री शिवछत्रपती विद्यालयाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णासाहेब जाधव याचं निधन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२१) :- जेष्ठ समाजसेवक व चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णासाहेब जाधव (वय ८०) यांचे आज मंगळवार (दि. १३) रोजी सकाळी ११.४९ वा. वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मागील आठ दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर अल्पसा आजार व वृद्धपकाळाने त्यांचे आज निधन झाले. श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाची त्यांनी स्थापना केली. त्यांच्या सायन्स, गणित लॅब व इतरही अनेक गुणांचे मान्यवरांकडून मोठे कौतुक झाले.
शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक तथा शाळेचे पर्यवेक्षक प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी अण्णांना श्रद्धांजली अर्पण केली. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, अण्णांच्या शैक्षणिक प्रवासाची खडतर सुरुवात झाली. प्रतिकूल परिस्थितीतही इच्छाशक्ती प्रबळ असल्यानेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश त्यांनी प्राप्त केले. त्याचमुळे शिक्षणमहर्षी, शिक्षणभूषण, विद्याभूषण अशा अनेक उपाधींनी आण्णांना सन्मानित करण्यात आले. नि:स्वार्थ हेतूने सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन चांगल्या उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणाऱ्या आण्णांच्या शिस्त, संस्कार आणि अनुभवांच्या स्मरणीय आठवणी सदैव स्मरणात राहतील, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
















