- लसीकरणाचा लेखाजोखा वरिष्ठांना कळविण्याचा आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२१) :- महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यांनी त्वरित घ्यावी. घेतल्या बाबतचे लेखी स्वरूपात आपल्या विभागात, कार्यालयात कळविण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात शिक्षक कर्मचाऱ्यांसह एकूण ७ हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी काम करतात. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी रहावे. कोरोना आजारापासून संरक्षण मिळावे. याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारली आहेत.
जास्तीत – जास्त नागरिकांना आणि महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लसीकरण करून घेण्याबाबत यापूर्वीच वेळोवेळी अवगत करण्यात आले आहे. तरीदेखील अद्यापपर्यंत बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिका आस्थापनेवरील ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. त्यांनी त्वरित नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घ्यावी. लस घेतल्याबाबत तसे लेखी स्वरूपात आपल्या विभागात कळवावे, असे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.
















