- तीन दिवसात २५ खासगी रुग्णालयं पालिकेच्या ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता खासगी रुग्णालयांची सेवा अधिग्रहित केल्या जात आहेत. तीन दिवसांध्ये २५ खासगी रुग्णालय पालिकेने ताब्यात घेतली आहेत. तर आतापर्यंत प्रशासनाने ८६ खासगी रुग्णालयांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. त्या रुग्णालयांतील ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड करोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत, अशी माहिती राजेश पाटील यांनी दिली.
शहरातील करोना परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांबाबत ते बोलत होते. मागील महिन्यामध्ये ५० खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. तर या महिन्यामध्ये पुन्हा ३६ खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
यासोबतच आणखी ६ खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेथीलही बेड लवकरच रुग्णांना उपलब्ध करून दिले जातील. तसेच पुढील काही दिवसांमध्ये पालिकेचे थेरगाव येथील रुग्णालयातही बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत तिथे गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. खासगी रुग्णालयांच्या सेवा अधिग्रहित केल्यामुळे पालिका प्रशासनाला अतिरिक्त १३७९ ऑक्सिजन बेड व ४५ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाल्याची माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.
















