- सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर व क प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे यांनी केला अधिनियम कलम भंग
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर व महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे व सहायक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे यांनी कामात केलेला कसूर आयुक्तांसमोर सिध्द झाल्यामुळे या तिन्ही अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
याबाबत इंदलकर यांनी नोटीसीला खुलासा सादर केलेला आहे. त्यात म्हटले की, लाभार्थ्यांचा सहभाग व प्रतिसाद असल्याशिवाय कामकाज पुर्ण होवू शकलेले नाही. लाभार्थ्यांनी अद्यापही स्वःहिस्याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे सदनिका वाटप प्रक्रिया राबविण्यास अडचण निर्माण होत असल्याचा खुलासा केला. परंतू, हा खुलासा संयुक्तिक व समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे इंदलकर यांनी घरकुलाचे वाटप प्रक्रिया राबविण्यास बराच विलंब व दिरंगाई करुन कर्तव्यात कसूर केली आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 72 (क) भंग केल्याचे स्पष्ट होत आहे. यानुसार इंदलकराना सक्त समज देण्यात आली. याशिवाय भविष्यात कार्यालयीन कर्तव्य पालनात कसूल केल्यास शास्तीची कारवाई करण्यात येईल, त्याची सेवा पुस्तकांत नोंद घेण्यात यावी, असेही आयुक्त हार्डिकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होवू नये, म्हणून स्वच्छता व आरोग्य विषयक कामे करण्यात येतात. सर्व परिसराची स्वच्छता व संबंधित आरोग्यविषयक बाबीवर नियंत्रण ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिका-यांची असते. यावर आयुक्तांनी क प्रभागाची २३ आक्टोबर २०१८ रोजी स्वच्छतेविषयक बाबीचा तपासणी केली. बहुतेक सर्व परिसरात ठिकठिकाणी कचरा साचून दुर्गंधी पसरलेली आढळून आलेली आहे. त्यामुळे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे व सहायक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला होता.
दोन्ही अधिका-यांनी आयुक्तांना सादर केलेला खुलासे समाधानकारक वाटले नाहीत. साफसफाई कामकाजात गांभिर्याने लक्ष न घातला व जबाबदारीपुर्वक कामकाज करुन घेत नसल्याचेही निदर्शनास आले. दोन्ही अधिका-यांनी कर्तव्यात कसुर करुन महाराष्ट्र नागरी सेवा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे क प्रभागाचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, सहायक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे यांनी कामकाजात केलेला हलगर्जीपणा व स्वच्छतेविषयक साफसफाईचे कामे करुन घेण्यास बेफीकिरी, अनास्था दाखविल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही अधिका-यांना प्रत्येक दोनशे रुपये शास्ती आकारण्यात येत असून त्याच्या वेतनातून कपात करण्यात येणार आहे. तसेच सदरील आदेशाची नोंद संबंधिताच्या सेवा नोंद पुस्तकांत घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.










