न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसें.) :- महानगरपालिका आस्थापनेच्या वर्ग १ व २ पदांवरील विविध विभागातील वरिष्ठ अधिका-यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात येवू नये. अतिरिक्त पदभारामुळे अनेक अधिका-यांना एकाही विभागाचे सुरळीत कामकाज करता येईना झाले आहे. त्यांना नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यास वेळ देखील मिळेना झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांकडे एकापेक्षा अधिक अतिरिक्त पदभार काढून घ्यावा, अशी मागणी विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी केली.
याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरुळीत आणि गतिमान होण्यासाठी आपण राज्य शासनाकडील प्रलंबित आकृतीबंधाबाबत पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मागील दोन वर्षापासून आकृतीबंध अद्याप तो मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. तसेच, महापालिकेच्या मुलभूत सोयी-सुविधा देणाऱ्यां विभागांत देखील अपुऱ्या कुशल मनुष्यबळाअभावी कामकाजात अडथळा निर्माण होऊन नागरिकांना त्रास होत आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागाचा पदभार न देता, एकाच विभागाचा पदभार देण्यात यावा.तसेच, त्या विभागांतील अन्य रिक्त पदांवर, सेवा ज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हतेनुसार योग्य आणि सक्षम व्यक्तीला काम करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली.
महानगरपालिकेच्या आकृतीबंधाचे काम न झाल्याने अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार द्यावा लागतो आहे. महापालिकेमध्ये वर्ग १ आणि २ च्या पदांवरील अधिकाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. अधिकाऱ्यांची अतिरिक्त कार्यभारातून सूटका करायची असेल, तर त्यासाठी आकृतीबंधाचे काम होणे गरजेचे आहे. – आयुक्त श्रावण हर्डीकर










