- पालिकेच्या ऑटो क्लस्टर कोविड उपचारासाठी स्वीकारली लाखाची लाच...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आयसीयूची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगत “एक लाख रुपये द्या आम्ही बेड मिळवून देतो”, असे सांगितले. मुळात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणारे ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांना मोफत उपचार आहेत. तरीही एक लाख रुपये घेऊन त्यांना महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेतले.
ही माहिती चिखलीतील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक विकास डोळस यांच्यासह गुरुवारी ऑटो क्लस्टर गाठले. गायकवाड आणि डोळस यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याबद्दल जाब विचारला. संबंधित खासगी हॉस्पिटलने पैसे घेतले असतील असे सांगून कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलने हात झटकले.
मात्र, संबंधित रुग्णाच्या नातेवाईंकांनी नगरसेवकांना पुरावे दाखवले. त्यानंतर या नगरसेवकांनी त्यांचा मोर्चा संबंधित खासगी हॉस्पिटलकडे वळविला. तेथील डॉक्टरला जाब विचारला. डॉक्टर फैलावर घेतल्यावर या डॉक्टरने ‘स्पर्श’च्या सल्लागाराचे नाव घेतले. त्याने ८० हजार रुपये घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर हा सगळा गैरप्रकार उघडकीस आला.
या संदर्भात स्पर्श संस्थेचे संचालक डॉ. अमोल होळकुंदे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत त्यांनी बोलणे टाळत महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याशी संपर्क करण्यास सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.