न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- दारूअभावी अस्वस्थ झालेल्या तळीरामाने कोविड सेंटरमधील रिकाम्या पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. २९) बालनगरी, भोसरी येथे सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. हरीश गायकवाड (३६, रा. दिघी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्णाचे नाव आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश याला दारूचे व्यसन आहे. तो कोरोनाबाधित झाल्याने त्यास बालनगरी, भोसरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
मात्र, दारू न मिळाल्याने अस्वस्थ होऊन त्याने तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतरही दारू मिळत नसल्याने हरीश याने पाण्याच्या टाकीत उडी मारली. सुदैवाने पाण्याची टाकी रिकामी असल्याने अनर्थ टळला. हरीश याच्या पाठीला मार लागल्याने दुसरीकडे हलविण्यात आले आहे.