- आकुर्डी व थेरगाव रुग्णालये सुरू करण्याची आयुक्तांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड सेंटरला खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) भेट दिली. जम्बो सेंटरची संपूर्ण माहिती घेतली. रुग्णाची परिस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती घेतली.
आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जम्बोचे समनव्यक असलेले सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, नोडल ऑफिसर सुनील पवार, जम्बोचे व्यवस्थापक डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रिती व्हिक्टर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, योगेश बाबर, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे उपस्थित होते.
शहरातील खासगी, महापालिका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता भासू देऊ नका, ऑक्सिजन वाया जाऊ देऊ नका, आवश्यक रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला पाहिजे. महापालिकेने २५० च्या पुढे खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. खासगी रुग्णालयातील बिलाच्या येणाऱ्या तक्रारी निकाली काढाव्यात. रेमडीसीविर इंजेक्शनचा कोटा जिल्हाधिका-यांमार्फत येत आहे. काही प्रमाणात तुटवडा असून तो दूर करावा.
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता बेड वाढविण्याची आवश्यकता आहे. आकुर्डी ३०० आणि थेरगाव रुग्णालयात ३०० अशी ६०० बेडची क्षमता असलेली रुग्णालये सुरू करावीत. ऑक्सिजन व्यवस्थेचे काम पूर्ण करून येत्या आठ दिवसांत रुग्णालये सुरु करावीत,अशी सूचनाही केली.
महापालिकेच्या वतीने रुग्णांना दिले जाणारे जेवण व्यवस्थित असते का, रुग्णांशी बोलून दिले जाते का, रुग्णाच्या प्रकृतीची माहिती दिली जाते का, जेवण चांगले असते का याची विचारणा खासदार आप्पा बारणे यांनी नातेवाईकांना केली. योग्य सोय असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आरोग्य व्यवस्था, प्रशासनावर ताण आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला साथ द्यावी. राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहे. महापालिका प्रशासन झोकून देऊन काम करत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. गर्दी टाळावी. नियमांचे पालन करावे.


















