- खुलासा द्या अन्यथा फौजदारीला तयार रहा; पालिकेचा इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मे. २०२१) :- ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या संस्थेत बेडसाठी लाख रुपये लाटणाऱ्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार कऱणाऱ्या स्पर्श हेल्थकेअर संस्थेला महापालिकेने मोठा दणका दिला. आज (रविवारी) स्पर्श कडून सर्व काम काढून घेण्यात आले आणि त्यांचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेने स्पर्श व्यवस्थापन समाधानकारक काम करु शकलेले नाही, कामात हेळसांड केली असा ठपका ठेवला आणि ताबडतोब काम काढून घेतले. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श च्या कर्मचाऱ्यांचा रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजारात सहभाग हे गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे स्पष्ट दर्शविते, ते मानवतेला काळीमा फासणारे आणि व्यवस्थापनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट करते, असा ठपका ठेवला आहे.
मानवतेला काळीमा फासणाऱ्या गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणे, स्पर्शचे हॉस्पिटल व्यवस्थापन निकृष्ट गुणवत्तेचे असल्याचा ठपका ठेवत आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श चालवीत असलेले ऑटो क्लस्टर हॉस्पिटल डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह तत्काळ प्रभावाने आजपासून अधिग्रहित केले. तसेच स्पर्शला काळ्या यादीत का टाकू नये, फौजदारी कारवाई का करू नये, अशा अशयाची कारणे दाखवा नोटीस बजावत चार दिवसांत खुलासा मागविला आहे. स्पर्श च्या डॉक्टरांनी चार रुग्णांकडून बेडसाठी पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. याप्रकरणातील अटक केलेल्या चार डॉक्टरांकडून तीन लाख ७० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली.
आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर वैद्यकीय समन्वयक म्हणून डॉ. अभंयचंद्र दादेवार, प्राध्यापक मनजीत संत्रे, सहयोगी प्राध्यापक संतोष थोरात, सहप्राध्यापक डॉ. अतुल देसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शगुन पिसे, सहयोगी प्राध्यापक डॉ. आनंद कराळे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.