- न्यायालयाकडून पोलीस कोठडी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- दारू पिऊन भांडण करतो, आईशी वाद घालतो, तसेच पैसे उडवतो या कारणावरून धारदार हत्याराने वार करून मोठ्या भावाचा खून केला. याप्रकरणी लहान भावासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी सहा तासांत अटक केली. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. ११) पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोज ज्ञानेश्वर बो-हाडे (वय २५, रा. बो-हाडेवाडी, मोशी), असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.
तर, त्याचा भाऊ अक्षय ज्ञानेश्वर बो-हाडे (वय २२, रा. बो-हाडेवाडी, मोशी) व त्याचा साथीदार संदीप दिलीप सुरवसे (वय २४, रा. बो-हाडेवस्ती, मोशी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनोज बो-हाडे हा दारू पिऊन भांडण करतो, आईशी वाद घालतो, तसेच पैसे उडवतो, या कारणावरून आरोपी अक्षय बो-हाडे आणि त्याचा साथीदार आरोपी सुरवसे यांनी धारदार हत्याराने वार करून खून केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस कर्मचारी शरद गांधिले, विजय दौंडकर अनिल जोशी, करन विश्वासे, रहीम शेख, नितीन खेसे, विशाल काळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.