- माझ्यावरील हल्ल्याचा पूर्वनियोजित कट – आ. बनसोडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. तान्हाजी पवार असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ‘याप्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील’, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
या घटनेविषयी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले,”अॅन्थनी म्हणून एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तीन साडेतीन वर्षांपासून तो आमच्याकडे काम करतोय. त्याचा तान्हाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझ्या पीएने फोन केला होता. मागच्या दहा दिवसांपासून त्याला फोन करतोय. दोन मुलं कामाला घे इतकंच त्याला सांगितलं होतं. बोलतानाच त्याने अरेरावी केली. तेव्हढंच झालं. त्यानंतर तो आज सकाळी आला. माझ्यासोबत त्याचं बोलणं झालं. मी त्याला विषय सोडून द्यायला सांगितलं. त्याच्या मालकालाही मी याबद्दल बोललो. दरम्यान, तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबारच केला. येताना तो पूर्वनियोजन करुनच आला असावा, कारण त्याने सोबत त्याचा साथीदार, त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल होतं,” असं आमदार बनसोडे म्हणाले.
कोणतीही वादावादी झाली नाही. त्याने वाद घातला. मग माझ्या कार्यालयात काही कार्यकर्ते होते. त्यांनी ते बघितलं. त्यांनी त्याला शिवीगाळ केली. त्याने गोळीबार केल्यानंतर मुलांनी त्याला धक्का देऊन खाली पाडलं. नंतर त्याला मारहाण केली. तोपर्यंत त्याने दोन फैरी झाडल्या होत्या. पहिली गोळी माझ्या दिशेनं झाडली. पण, एका मुलाने धक्का मारल्याने ती दुसऱ्या दिशेला गेली. त्याला कुणी पाठवलं होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. कचऱ्याचा कंत्राटदार जर पिस्तुल बाळगणारे सुपरवायझर ठेवत असेल, तर कसं व्हायचं,” असा सवालही बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.


















