- कोविड योद्ध्यांच्या वाढदिनी रुग्णांना अनोखी भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- निगडी पोलीस ठाणे व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने कोविड योद्धे विजय मुनोत व डॉ. राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांना आंब्यांच्या पेट्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आकुर्डी रुग्णालयाच्या मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, डॉ. राहुल साळुंखे, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, उपनिरीक्षक केरबा माकणे, जैन सोशल डायमंड ग्रुपचे संतोष छाजेड, संपर्क प्रमुख विजय मुनोत, समिती अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे म्हणाल्या, “समाजातील उपेक्षित आणि गरजु व्यक्तींना अश्या पद्धतीने आपुलकीने भेट घेणे व त्यांचे तोंड गोड करणे नक्कीच कौतुकास्पद आहे. समितीने दिलेल्या आंब्यांचे रुग्णांना वाटप केल्याने त्यांचा आनंद सणाच्या दिवशी द्विगुणित झाला आहे”.
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” गेल्या १५ महिन्यांपासून कोविड संक्रमण काळात जिवाची पर्वा न करता कोविड योध्ये डॉ. राजेश पाटील, विजय मुनोत हे शहरात कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. त्यांच्या वाढदिवशी आकुर्डी रुग्णालयातील कोविड बधितांना आज आंब्याचे वाटप करण्यात आले.”
निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर म्हणाले,” वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड सरांच्या मार्गदर्शनाने शहरातील स्वयंसेवी संस्थानसोबत वेळोवेळी समजउपयोगी उपक्रम राबविण्याचे काम पोलीस ठाणे करत आहे. लॉकडाऊन काळात वंचितांना व गरजूंना मदत देणे हा प्रमुख उद्देश आहे. समितीचे स्वयंसेवक पोलीस मित्र गेले अनेक वर्षांपासून पोलीस विभागाला सहकार्य करीत आहेत.”
जैन सोशल डायमंड ग्रुप चे संतोष छाजेड म्हणाले,” सध्या राज्यात तसेच आपल्या शहरात कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात संक्रमण केले आहे.अशा कठीण काळात सर्वांनी एकत्रित पणे कार्य करून या महामारीला हद्दपार करावयाचे आहे. त्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे प्रशासनाला सहकार्य करणे जास्त महत्वाचे आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीसंमवेत त्यासाठी आमची संस्था वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवित असते.”
या उपक्रमास विशेष सहकार्य रसिक पिसे,राजेश कर्णावट,विश्वजित हरगुडे, जयकुमार गुजर,मिलिंद सैंदाणे, आकुर्डी रुग्णालय कर्मचारी अशोक लोखंडे यांनी केले.


















