- महापालिका अंदाजत्रकीय तरतूद ठेवणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- पवना नदीमध्ये नाल्यांद्वारे थेट मिसळणारे सांडपाणी मैलाशुध्दीकरण केंद्रातून प्रक्रिया करुनच सोडणे अपेक्षित आहे. अद्यापही नदीपात्रात सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यावर उपाययोजना म्हणून चिंचवड – केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथे मैलाशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.
चिंचवड येथील मैलाशुध्दीकरण केंद्रासाठी ११ कोटी ५० लाख तर, वाल्हेकरवाडी येथील केंद्रासाठी १२ कोटी रुपयांची अंदाजत्रकीय तरतूद ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या डिसेंबर २०२० मध्ये नव्याने आलेल्या एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या पुररेषा अंतर्गत नवीन मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणे आता शक्य होणार आहे.
चिंचवड आणि केशवनगर ,सर्व्हे क्रमांक २९२ येथे ९५० चौरस मीटर क्षेत्रात महापालिकेचे पंपींग स्टेशन अस्तित्वात आहे. वाल्हेकरवाडी सर्व्हे क्रमांक ८६ येथे ९५० चौरस मीटर क्षेत्रात महापालिकेचे पंपींग स्टेशन अस्तित्वात आहे. त्यासाठी येणारा खर्च, मलनिस्सारण नलिकांच्या देखभाल दुरुस्तीचा होणारा खर्च पाहता वाल्हेकरवाडी व चिंचवड-केशवनगरला स्वतंत्र मैलाशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.


















