- प्रादेशिक संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करावा..
- राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकरांचे निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- राज्यात मार्च २०२० मध्ये कोविड १९ मुळे लॉकडाऊन लावण्यात आला. या लॉकडाऊन परिस्थितीत जिल्ह्यातील हजारो ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अविश्रांत श्रमत आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण ४००० अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गापैकी ४० टक्के कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून मान्यता न मिळाल्याने एकूण ६० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्रतीक्षेत आहे. त्यांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या कोविड लसीकरणासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळवावी, अशी मागणी पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य व शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी पुण्याचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या या कठीण काळात महावितरणाचे अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी विजेची उपलब्धता सुनिश्चित ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी पार पाडत आहेत. महावितरणाचा २४ तास अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवत असताना अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी बांधवांना कोरोना विषाणूची लागण झाली. काहींचा त्यात मृत्यू झाला तर, काही त्यातून सहीसलामत होऊन पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले. कर्तव्यावरील अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्ग हा वीज देयक वसुलीसाठी सतत बाहेर फिरत आहे. इतर कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे शहर तसेच जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गाला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खऱ्या कोरोना योद्ध्यांना कोरोना लसीकरणाची नितांत गरज आहे. मात्र, शासनाने दखल न घेतल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. महावितरण कंपनीच्या ग्राहकांच्या दुष्टीने हे चांगले नाही. या उर्वरित अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा, यासाठी प्रादेशिक संचालकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे योग्य तो पत्रव्यवहार करावा व सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. त्यांच्या कोविड लसीकरणासाठी गती द्यावी, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.
”महावितरणाच्या कोरोना योद्ध्यांना कोविड लसीकरण मिळावे, यासाठी यापूर्वीही शासन मान्यतेसाठी पत्र व्यवहार केला होता. त्यावेळी त्वरेने कार्यवाही करत मुख्य अभियंता, पुणे यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांची भेट घेवून कर्मचाऱ्यांची ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ अशी नोंद करून घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ४००० अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गापैकी ४० टक्के लसीकरण पूर्ण झाले.अद्याप ६० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे.”
– मा. संतोष सौंदणकर (सदस्य- महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती)…


















