- तो निधी रायगडाच्या विकासावर खर्च करा..
- राहुल कोल्हटकर यांची राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने एकवीरा देवी मंदिर व राजगड येथे रोप वे प्रकल्प साकारण्यासाठी IPRCL सोबत करार करण्यात आला. या रोप वे प्रकल्पाला दुर्गप्रेमी यांचा विरोध असल्याने दुर्गप्रेमी व दुर्ग संवर्धन संस्था यांच्या मागणीचा विचार करून हा रोप वे प्रकल्प रद्द करण्यात यावा. या रोप वे प्रकल्पाचा निधी किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तू व वारसा तसेच तेथील विकासासाठी खर्च करण्यात यावा. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाने गडावर बेकायदा उत्खनन करण्यास बंदी घातली असल्याने रायगडवर व तसेच इतर किल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था व दुर्गप्रेमी यांच्या मध्ये नाराजी निर्माण झाली असल्याने गड संवर्धन करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी माहिती घेऊन त्यांना गड संवर्धन करण्याची परवानगी देण्याचे आदेश तसेच त्या संवर्धनाच्या वेळी तेथे पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश संबधीत विभागाला देण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या किल्ले राजगड वरून २५ वर्ष पहिला ती स्वराज्याची पाहिली राजधानी किल्ले राजगड म्हणून सर्व शिवभक्तांना माहित आहे. किल्ले राजगड हा दुर्गम अभेद असा आहे, त्यामुळे येथे दुर्गप्रेमी मोठया संख्येने तो पाहण्यासाठी येत असतात स्वराज्याची अभेद्यता अनुभवायची असेल तर हे गडकोट पायीच चालून जाण्यातच आनंद आहे. असे अनेक शिव भक्ताचे मत असते. त्यामुळे हे जे गडकोट किल्ले आहेत ते असेच अभेद व ऐतिहासिक राहू द्यावे अशी मागणी शिव भक्त दुर्गप्रेमी यांची असते.
दि.११ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने एकवीरा देवी मंदिर व राजगड येथे रोप वे प्रकल्प साकारण्यासाठी IPRCL सोबत करार करण्यात आला असे सांगितले. त्यानुसार राजगडावर रोप वे साकारणार हे निश्चित आहे. किल्ले राजगडावर रोप वे करण्याची मागणी कोणी केली असेल हे माहीत नाही. पण खरे पाहता आपल्या सह्याद्रीच्या कुशीतील हे गडकोट पाहताना ते चढत असताना एक वेगळीच ऊर्जा शक्ति अंगात संचार करते व कितीही दुर्गम असलेला गडकोट चढायला शरीर थकत नाही असा अनेक दुर्ग प्रेमी यांचा अनुभव आहे. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे दुर्ग किल्ले आज सुस्थितीत नाही आहे त्याची दुर्दशा झाली आहे ते किल्ले व तो इतिहास जिवंत रहावा म्हंनुन अनेक दुर्ग प्रेमी , दुर्ग संवर्धन संस्था त्यांची डागडुजी , साफसफाई ते जतन करण्यासाठी स्वतःच्या पैशाने कार्य करीत आहेत त्यांना त्या कामात यश सुद्धा येत आहे. म्हणून तर काय अनेक किल्ल्यावर आज अनेक वस्तू सुस्थितीत दिसत आहेत.
राजगड संवर्धन करणाऱ्या संस्था पण राजगडचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. कालच्या रोप वे बाबत झालेल्या निर्णयामुळे अनेक शिवभक्त दुर्गप्रेमी नाराज झाले आहेत. पण खरे पाहिले तर गड किल्ले याच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे असतील तर गड किल्ले यांच्या संवर्धनाकरिता काम करणाऱ्या संस्था दुर्ग प्रेमी यांच्या कडूंन माहिती घेणे आवश्यक होते .आज त्यांच्या सोबत चर्चा करून या सारखे निर्णय घेण्यात यायला हवे. कारण स्वतःच काम ,व्यवसाय शिक्षण सांभाळत सुट्टीच्या दिवशी आठवड्यातील 2 दिवस हे सर्व दुर्ग प्रेमी राजगड सर्वधन तसेच दुर्ग संवर्धन यांचे काम करीत असतात स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून विविध किल्ल्यावरील वास्तू सुस्थितीत ठेवण्याचे काम करतात. या सर्वांच्या या कार्यामुळेच आज काही प्रमाणात आमचे किल्ले सुस्थितीत आहेत . खरे तर अशा लोकांच्या बैठका घेऊन कोणत्या किल्ल्यावर काय काय करता येईल तेथील बुरुज तटबंदी, मंदिर ,पाण्याच्या टाक्या ,गडावर जाणाऱ्या पायवाटा पायऱ्या तसेच सुरक्षिततेसाठी काय करता येईल याची माहिती घेऊन ती शासनाकडे पुरवून त्यांना शासन दरबारी लागणारी मदत करण्यासाठी मदत केली पाहिजे तसेच आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. अशा अनेक गोष्टी किल्ल्यावरील पर्यटन विकास यासाठी करता आल्या असत्या पण त्याकरिता योग्य निर्णय क्षमता नाही आहे.
आज राजगडावर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत राजगडाच्या संवर्धन साठी पावलं उचलायची सोडून रोपवेचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे.राजगडावर अनेक वास्तूंचे जतन-संवर्धन करणे काळाची गरज आहे. ज्या राजगडावर पायाने जाताना येणाऱ्या अडचणी, शिड्यांची झालेली दुरावस्था, पायाखालून निसटणारे दगड धोंडे,चंद्रकोर तळ्याची वाईट स्तिथी,सई राणीसाहेबांची समाधी स्थळाची अवस्था याची डागडुजी करण्याची गरज आहे. रोपवे नसताना सुदधा राजगडावर प्रचंड प्रमाणात गर्दी असते व या गर्दीच्या नियंत्रणासाठी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नाहीत.गडावर स्वच्छतेची वानवा आहे.महत्वाचा गड असूनही पर्यटकांसाठी टॉयलेट,बाथरूम सुविधा नाहीत त्यामुळे उघड्यावर मलमूत्र विसर्जन होऊन गडावर दुर्गधी पसरते.सदर,वाडे,माच्या, मुख्य दरवाजे,चोर दरवाजे, तटबंदी,बालेकिल्ला या वास्तू संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत निर्माण करता येत नसेल तर आहे तेवढे जतन केले तरी पुरेसे आहे. गडाचे गड पण व त्याची दुर्गमता घालवण्याचा हा प्रयत्न करू नका आपल्या राजाचा इतिहास , साहस, उतुंगता व किल्याची अभेद्याता पहायची व अनुभवायची असेल तर हे गडकोट किल्ले पायीच चढून जावून पाहायला हवे .
दुर्ग संवर्धन करण्यासाठी आपल्या वतीने जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्याबाबतीत आधी दुर्ग संवर्धन संस्था व दुर्ग प्रेमी याच्यासोबत चर्चा करून माहिती घेऊन खरच त्या किल्ल्यावर गरज कोणत्या कामाची आहे ते ठरवून योग्य निधी ची तरतूद करून दुर्ग संवर्धन च्या कामात शासकीय निधीची व परवानगी यांची मदत होईल अशी व्यवस्था करावी. तसेच राजगडवर रोप वे बनविण्याच्या जो काही निर्णय घेतला आहे तो रद्द करून महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या रोप वे प्रकल्पाचा निधी किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तू व वारसा तसेच तेथील विकासासाठी खर्च करण्यात यावा.
तसेच महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाने गडावर बेकायदा उत्खनन करण्यास बंदी घातली असल्याने रायगडवर व तसेच इतर किल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था व दुर्गप्रेमी यांच्या मध्ये नाराजी निर्माण झाली असल्याने गड संवर्धन करणाऱ्या संस्था याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे तरी गड किल्ल्यावरील उत्तखनन करीत असताना काही ऐतिहासिक वस्तू खजिना सापडत असतात त्याची माहिती त्याची माहिती पुरातत्व विभागाकडे असावी म्हणून गड संवर्धन करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी माहिती घेऊन त्यांना गड संवर्धन करण्याची परवानगी देण्याचे आदेश तसेच त्या संवर्धनाच्या वेळी तेथे पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश संबधीत विभागाला देण्यात यावे सदर निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या मागण्याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या या राजगड किल्ल्यावरील रोप वे साकारण्याचा निर्णय रद्द करून तो निधी दुर्ग संवर्धन या करिता खर्च करण्यात यावा तसेच दुर्गाच्या किल्ल्याच्या संवर्धनात काम करणाऱ्या संस्था मधील काही पदाधिकारी यांना व शासनाच्या पुरातत्व पर्यटन विभागामधील कर्मचारी याची एक समिती स्थापन करून तिचा वापर दुर्गावर करण्यात येणाऱ्या कामासाठी करण्यात यावा.


















