- तर, मदत नाकारणाऱ्या आयुक्तांच्या बाजूने राष्ट्रवादीची बॅटिंग…
- मात्र सर्व नगरसेवकांची वंचितांना आर्थिक मदतीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- कोरोना व लॉकडाऊन काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महापालिकेकडुन तातडीची मदत म्हणून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेने गेल्या महिन्यात घेतला होता. मात्र, महापालिका अधिनियमानुसार अशी मदत देता येणार नसल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले होते.
त्यावरून आज शुक्रवारी (दि. १८ ) सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले तर, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पाठराखण केली. मात्र, आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी केली.
कोविडमुळे आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबावर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा विषय स्थायी समिती सभेने मंजूर केला आहे. यामुळे शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर आदी सुमारे ४० हजार कुटुंबीयांना लाभ मिळणार होता. मात्र, आयुक्तांनी संबंधित ठरावावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा अभिप्राय मागविला. त्यानंतर महापालिका अधिनियमानुसार मदत देता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावर बोलताना सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी रिक्षा चालक, बांधकाम मजूर आदींना मदत करावी लागेल असे सांगितले. नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी आम्हाला आयुक्तांनी वेड्यात काढले, अशी भूमिका व्यक्त केली. अनुराधा गोरखे यांनी मदतीबाबत नागरिकांना आम्ही काय उत्तर देणार, असा सवाल केला. नगरसेविका आशा शेंडगे लोक आम्हाला विचारत आहेत त्यांना कोण समजवणार विरोधक बदनामीचे फ्लेक्स लावत आहेत, असे सांगितले. पक्षनेते नामदेव ढाके यांनी सर्व सामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम आयुक्तांनी केले असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश बहल यांनी आयुक्तांवर आरोप करू नये, कायद्यातील तरतूद पहावी असे सांगितले तर जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी शाब्दिक राजकारण करू नका, मदतीबाबत विचार करावा अशी भूमिका मांडली तर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आयुक्तांना थोडा वेळ द्या, ते योग्य निर्णय घेतील असे सांगितले तर शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी देशाच्या वाघाने केलेली पंधरा लाखाची व महापालिकेने केलेली तीन हजाराची घोषणा सत्यात उतरविण्याची मागणी केली.