- प्राधिकरणाचे क्षेत्र पालिकेच्या अखत्यारीत; सत्ताधारी भाजपची सभेत मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२१) :- राज्य शासनाच्या अधिसूचनेनूसार पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित करुन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.
भाडेपट्ट्याने दिलेले व विकसित झालेले भूखंड याबरोबरच सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणाखालील भूखंड व ज्यावर अतिक्रमण झालेले आहे असे भूखंड यांची मालकी व ताबा पिंपरी चिंचवड महानगरपलिकेस सुपूर्द करण्यात आले आहे. हे क्षेत्र एक रुपये नाममात्र दराने हस्तांतरित करण्यासाठी महापालिका महासभेत आज उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली.
या आरक्षित असणाऱ्या परंतु प्रत्यक्षात नवनगर विकास प्राधिकरणाच्या ताब्यात नसणाऱ्या भुखंडावर शहरातील गरजू व कामगार वर्गाने जमेल तसे मूळ जमीन मालकांकडून गुंठा, दोन गुंठा जागा खरेदी करुन स्वत: राहण्यासाठी घरे बांधलेली आहेत. ज्या नागरिकांनी स्वत: राहण्यासाठी घरे बांधलेली आहेत अशा सर्व नागरिकांकडे ताबा असलेल्या क्षेत्रानुसार रुपये एक या नाममात्र दराने हस्तांतरित करण्यास महासभेत मान्यता देण्यात आली. यामुळे प्राधिकरणातील १ लाख घरांना अधिकृत दर्जा मिळणार आहे, असा कयास सत्ताधारी भाजपने बांधला आहे.


















