- अपर पोलिस आयुक्तांकडून कारवाईचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- वर्चस्वासाठी गंभीर गुन्हे करणाऱ्या माने टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. १८) आदेश दिले. काळेवाडी फाटा परिसरात माने टोळी सक्रीय होती.
टोळी प्रमुख सुमित सिद्राम माने (२१, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी फाटा, वाकड), अभिषेक भाऊसाहेब रोडे (१८, रा. श्रमिक कॉलनी, दत्तनगर, थेरगाव), मारुती केरनाथ देठे (२०, गजानन मेडीकलसमोर, कस्पटे वस्ती, वाकड), सूरज हरीभाऊ तिकोणे (२५, रा. सोनाई कॉलनी, दत्तनगर, थेरगाव), पवन भारत बलवंते (१९, रा. गणपती मंदिराजवळ वाकड), जीवन त्रिभुवन (रा. कैलासनगर, पिंपरी), भावेश (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार सुमित माने आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात बेकायदा जमाव करणे, मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या जोरावर आरोपी आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली.