- चिखलीतील घटना; सात जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- आरोपी नम्रता कर्पे ही फिर्यादी निर्मला कर्पे यांची सून आहे. आरोपी नम्रता आणि तिचा पती हे दोघेही विभक्त राहतात. आरोपी नम्रता आणि तिचा पती यांच्यात वाद झाला. यातून चिडून जाऊन आरोपी हे नम्रता हिच्या सासू असलेल्या फिर्यादी निर्मला यांच्या घराबाहेर एकत्र आले. त्यावेळी मोठमोठ्याने आरडा-ओरडा करण्याचा आवाज आल्याने फिर्यादीने त्यांच्या घराच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांची सून नम्रता तसेच तिच्या नातेवाईकांसह इतर आरोपी घराबाहेर उभे होते.
सिमेंटचे गट्टू व लोखंडी रॉडने आरोपींनी गेटचे लॉक तोडून ते सर्वजण फिर्यादीच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आले. तेथे सिमेंटचे गट्टू, विटा व लोखंडी रॉडने चारचाकी वाहनाच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. तसेच दरवाजावर दगड मारून दरवाजावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान केले. तुम्ही खाली या, तुमचे नरडे चिरतो, अशी धमकीही आरोपींनी दिली. चिखली येथे गुरुवारी (दि. १७) रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली.
निर्मला मधुकर कर्पे (वय ५६, रा. देहू-आळंदी रस्ता, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १८) फिर्याद दिली आहे. नम्रता धनराज कर्पे (रा. चिखली), मयूर बनकर, राहुल बनकर, अजय बनकर, संजय बनकर, आप्पा गोरे, पांडुरंग वाडकर (सर्व रा. उरळी कांचण, पुणे), अशी आरोपींची नावे आहेत.