- योग दिनानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून २०२१) :- योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं.
यावेळी त्यांनी करोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
“आज जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे. बाहेर कितीही संकट असलं तरी आपल्याकडे तोडगा असल्याचं योगा सांगत आहे,” असं मोदी म्हणाले.