- सत्ताधारी भाजपची ‘मलिदा’ लाटणारी ‘पे अँड पार्क’ योजना हद्दपार करा..
- शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- सत्ताधारी भाजपने शिवसेनेचा विरोध असतानाही बहुमताच्या जोरावर पिंपरी चिंचवड शहरात ‘पे अँड पार्क’ योजना लागू केलीय. मुळात या योजनेत अनेक त्रुटी आहेत. शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बँकांसमोर पालिकेने ‘पे अँड पार्क’ केले आहे. बँकेत पाच मिनिटांच्या कामासाठी आलेल्या ग्राहकाला पाच ते वीस रुपयांच्या पावत्या फाडाव्या लागत आहेत. रस्त्यावर लावलेल्या वाहनांकडून दंड आकारला जातोय. ही सावकारी थांबवा, तुमची दडपशाही बंद करा व ‘पे अँड पार्क’ योजनेतून बँकांना वगळा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालिका प्रशासनाला दिला आहे.
पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात १ जुलैपासून ‘पे अँड पार्क’ ही योजना कार्यान्वित केली. या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी शहरात सुरु आहे. यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे त्यात एकूण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. त्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेनुसार शहरात दिवसा आणि रात्रीही नियोजित रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
पुरेशा जागेअभावी बँकातील पार्किंग सुविधा आधीचीच तोकडी. त्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकाला रस्त्यावर वाहनं पार्क करावी लागतात. ‘पे अँड पार्क’ मुळे रस्त्यावर लावलेल्या वाहनांकडून पावतीच्या माध्यमातून दंड आकारला जातोय. नागरिक संभ्रमात आहेत. आर्थिक भुर्दंडालाही सामोरं जावं लागतयं. पिंपरीतील स्टेट बँक, संभाजीनगरमधील एचडीएफसी बँक, आकुर्डीची सेन्ट्रल बँक व शहरातील इतरही खासगी व सरकारी बँकांमध्ये पार्किंगला जागाच नाही. वाहनं रस्त्यावर लावल्यामुळे पावती फाडणारं व्यवस्थापन व नागरिकांमध्ये बाचाबाची होतेय. हा प्रकार थांबवा व बँकासमोरील ‘पे अँड पार्क’ हटवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही संपूर्ण शहरातूनच ‘पे अँड पार्क’ योजना बंद करू, असे या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे.
‘पे अँड पार्क’ ला विरोध मुळीच नाही. मात्र, अशा जाचक योजनेसाठी नागरिकांच्या सुचना/हरकती यांचा विचार झालेला नाही. योजनेचा कोणताही आराखडा जनतेपुढे ठेवलेला नाही. केवळ मलिदा लाटण्यासाठी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी भाजपने ही योजना मंजूर केली. त्याला शिसेनेचा विरोध आहे. शासनाच्या जागेवर ‘पे अँड पार्क’ करा. बँकांच्या आवारात कशाला ‘पे अँड पार्क’ करताय? व्यवसायिक असो की साधा खातेदार यांची दररोज बँकेत वर्दळ असते. मग उठसुठ पाच-दहा मिनिटाला वाहनं पार्क करण्यासाठी पावती फाडायची? हे सहन केलं जाणार नाही.
– विजय गुप्ता (शिवसेना, पिंपरी विधानसभा समन्वयक) …