- पाच जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२१) :- एकाच आरोपींनी दोन ठिकाणी लुटमार व वाहनांचे नुकसान केले आहे. बॉम्बे सुपारी या दुकानाचे शटर चोरटे उचकटत आहेत, अशी माहिती फिर्यादी एकला मिळाली. फिर्यादी मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानाकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठून जीवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की करून रॉडचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातून दोन हजार १५० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. रस्त्यावर दांडके आणि रॉड घेऊन गोंधळ करत सार्वजनिक शांततेचा भंग केला.
दुसऱ्या फिर्यादीच्या काळभोरनगर येथे गणेश ऑटोमोबाईल्स गॅरेजसमोर दुरुस्तीसाठी लावलेल्या आठ गाड्यांवर दगड, सिमेंट ब्लॉक मारून नुकसान केले. त्यातील एका कार (एम एच १४ / डी एफ ५८८६) मधून १५ हजार रुपये किमतीचा कारटेप चोरून नेला. त्यानंतर दांडके आणि रॉड घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले.
पहिले फिर्यादी काशीफ आरिफ खान (वय २७, रा. काळभोरनगर, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. १६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर दुसरे फिर्यादी राजेश सुधाकर क्षीरसागर (वय ४०, रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
सागर सुनील शहा (वय २१, रा. मोहननगर, चिंचवड), अविनाश गोपाळ हरिजन उर्फ अविनाश टाक (वय २१), मुकेश गणेश प्रसाद (वय २१, दोघे रा. मोरेवस्ती, चिखली), सागर पोळ, किरण वाघमोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.