- खिडक्यांची तोडफोड, दारे व लिफ्टचे नुकसान..
- पालिकेला फुकटचा भुर्दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावरील पत्राशेड येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. पहिल्या इमारतीतील दुरुस्तीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. टप्प्याटप्प्याने येथील ५६० सदनिकांचे वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात ५ इमारतीमध्ये एकूण ५६० सदनिका उभारल्या आहेत. प्रकल्पाचे बांधकाम डिसेंबर २०१२ मध्येच पूर्ण झालेले आहे. मात्र, हा प्रकल्प मैलाशुद्धीकरण केंद्राच्या जागेवर उभारल्याच्या कारणावरून त्याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. या याचिकमध्ये उच्च न्यायालयाने ९ जुलै २०१४ रोजी स्थगिती आदेश दिले. त्यामुळे येथील ५६० सदनिकांचे लाभार्थ्यांना वाटप करता आले नाही.
दरम्यान, आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर न्यायालयाने दिलेले स्थगिती आदेश २२ नोव्हेंबर २०१९ रोजी उठविले. त्यानंतर या प्रकल्पातील सदनिका वाटपाचा मार्ग मोकळा झाला. बांधकाम होऊन साडेआठ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत काही नागरिकांनी प्रकल्पातील खिडक्यांची तोडफोड केली. दारे काढून नेली. लिफ्टचे नुकसान केले. महापालिका प्रशासनाने या प्रकल्पासाठी २५ कोटी ३७ लाख रुपये इतकी रक्कम यापूर्वीच खर्च केली आहे.