- चोरलेल्या दुचाक्यांची ट्रॅव्हल्समधून वाहतूक; आरोपींना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- वाहनचोरी प्रकरणी भोसरी पोलिसांकडून तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुूटेजमधील संशयित व्यक्ती पेट्रोल पंपाच्या मागे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने पिंपरी, भोसरी, निगडी परिसरातून २२ दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. भोसरीत पार्क केलेल्या चोरीच्या १२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच १० दुचाकी राजेश महाजन, सुपडू ठाकणे, संतोष महाजन, निलीेश ढगे यांना दिल्याचे सुनील महाजन याने सांगितले. त्यांच्याकडील दुचाकीही जप्त केल्या.
आरोपी हा शहरातून दुचाकी चोरी करीत होता. ती दुचाकी खासगी ट्रॅव्हल्स बसमधून जळगाव येथे विक्रीसाठी पाठवित होता. त्यासाठी ट्रॅव्हल्स बसचे चालक व क्लिनर आरोपी मदत करीत होते. जळगाव व मध्यप्रदेशातून चोरीच्या दुचाकी व ट्रॅव्हल्स बस असा एकूण एक कोटी एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भोसरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
सुनील वामन महाजन (वय ५२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), राजेश विश्वनाथ महाजन (वय ३८, रा. वाघोदा खुर्द, पो. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव), सुपडू बोंदर ठाकणे (वय ३४, रा. केरळा बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव), संतोष नामदेव महाजन (वय ३९, रा. कर्जोद, पो. वाघोड, ता. रावेर, जि. जळगाव), नीलेश जनार्धन ढगे (वय ३७, रा. आव्हा, ता. मोताळा, जि. बुलढाणा), अशी आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस ठाण्याकडील पाच, पिंपरी पोलीस ठाण्याकडील सात व निगडी पोलीस ठाण्याकडील दोन, असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
















