- विरोधकांच्या मागे खरा प्रशांत किशोर कोण?..
- पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ‘पुन्हा बेडूक उड्यांचा’ सराव सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत, राजकीय गोटात पुन्हा एकदा बेडूक उड्यांचा सराव सुरु झाल्याचे पहावयास मिळतंय. कोणता मासा कोणत्या गळाला लागणार याची उत्सुकता तर सोडाच, उलट गळाला लागणारा मासाच स्वतः बरोबर दुसऱ्यालाही पाण्यात ओढून नेतोय, अशा चर्चांना उधान फुटलंयं. याचं सुंदर उदाहरण म्हणजे मैत्रीदिन. पालिकेचे आजी व माजी कारभारी चहासाठी एकत्र जमले अनं गप्पांचा फड रंगला. मध्येच चहाला उकळी फुटली. अनं मग दोन्हीकडेही सारवा-सारवीचे कारण (राज) सुरु झाले.
या ‘चाय पे चर्चा’मध्ये भाजप आमदार व राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन्हीकडचा पक्षीय अजेंडा वेग-वेगळा असतानाही (म्हण बदलून) ”सख्ये मित्र पक्के वैरी” पक्षभेद विसरून एकत्र आले. मात्र गप्पांच्या ओघात पक्षीय संहिताच विसरले.
पिंपरी चिंचवड शहरात प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी हा सत्ताधारी भाजपला खिंडार पडण्याची योजना आखतोय. सत्ताधाऱ्यांचे मुख्य कारभारी भाजप आमदार यांना गळाला लावण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. निवडणूक रणनितीकर म्हणून विरोधी पक्षनेते हे स्वतः पुढाकार घेत आहेत, की त्यांच्या मागे कोणी प्रशांत किशोर आहेत, याचे उत्तर येणारा काळच देईल.
सत्तेच्या सारीपाटात जादुई आकड्यांची गमंत लीलया पार करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. त्याशिवाय गणित बरोबर जुळत नाही. चाय पे चर्चावरून राष्ट्रवादीला सत्तेचे समीकरण जुळवता येईल का? की राष्ट्रवादीचेच प्रमुख मोहरेच भाजपच्या गळाला लागतील? याची पडताळणीही होईल. असे झाले तर, सत्ताधारी भाजप अल्पावधीतच राष्ट्रवादीचा सर्जिकल स्ट्राईक करण्यात यशस्वी होईल.
उघड-उघड मैत्रीच्या नावाखाली पक्षाची ध्येयधोरणे खुंटीला टांगून विरोधी पक्षाचा कारभारी सत्ताधाऱ्याशी हात मिळवणी करतोय. अनं छातीठोकपणे पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता, पक्षाची ध्येयधोरणे आपणच ठरवत असल्यागत वल्गना करतोय. याकडे खरचं शहराध्यक्षाचा कानाडोळा आहे की गांधारीची भूमिका. २०१७ ला हीच भूमिका पक्षाला मारक ठरली होती, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.