- कार्यालय सीलबंद, लाच प्रकरणी स्थायी अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकावर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची आज बुधवारी (दि. १८) रोजी स्थायी समितीची सभा होती. महापालिका भवनात स्थायी समितीच्या स्वीय सहाय्यकास लाच घेताना सायंकाळी साडेचारच्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यां नी अचानक पालिकेतील महापौर व स्थायी समिती कार्यालयावर धाड टाकली.
या धाडीमुळे पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर धांदल उडाली होती. सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन पुरुष व एक महिला अधिकारी स्थायी समितीच्या कार्यालयामध्ये अचानक आले. स्थायी समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला व ते कुलूपबंद केले.
दरम्यान ९ लाखाचे लाच प्रकरण असल्याची माहिती समोर येत आहे. ९ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील २ लाख रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. सभापती नितीन लांडगे, अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांना देखील लक्ष केल्याचे समजते. त्यांना चौकशीसाठी पुण्यातील कार्यालयामध्ये नेण्यात आलं आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप पुढील सविस्तर तपशील मिळू शकलेला नाही.