- बड्या बिल्डरांच्या नावांचा समावेश; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२१) :- बिल्डरांकडून ठेकेदारी पद्धतीने काम घेऊन काम झाल्यावर इसमाला कामाचे पैसे दिले जात नव्हते. त्यापैकीच एकाकडे कामाचे पैसे मिळावेत, यासाठी तगादा लावला. परंतु पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे इसमाने मंगळवार (दि. २४) पासून चिंचवड स्टेशन येथील एका बिल्डरच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. मात्र, दिवसभर थांबूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास इसमाने विषारी औषध प्राशन केले. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. आरोपींनी संगनमत करून बांधकामाचे पैसे न देता इसमाची एक कोटी ९४ लाख एक हजार ६१६ रुपयांची फसवणूक केली. तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. प्रवीण पंडीत पाटील असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. विनोद भाऊराव पाटील (वय ४८, रा. जळगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, ३०६, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश जगदीशप्रसाद अगरवाल, संतोष रामअवतार अगरवाल, राहुल भंडारी, अजित सुभाष गायकवाड, अभिजित गायकवाड, सचिन किल्लेदार, ललित जैन आणि अन्य जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोद भाऊराव पाटील (वय 48, रा. जळगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर तपास करीत आहेत.