- आयुक्तांकडून समितीची स्थापना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी – चिंचवड शहरातील वॉर्डाच्या सीमा निश्चित करून आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांमार्फत समिती स्थापन करण्यात आली असून प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याचे काम शुक्रवारी (दि .२७) पासून सुरु झाले आहे.
गूगल अर्थ म्हणजेच अपडेट गूगल मॅपच्या सहायाने प्रभागांची रचना केली जाणार असून प्रारुप आराखड्याचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण केले जाणार आहे. नव्याने प्रभागांची रचना करण्यासाठी शहराची माहिती असलेले अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, नगर रचनाकार, संगणक ऑपरेटर आदींची समिती आयुक्त राजेश पाटील यांनी स्थापन केली आहे.
समितीमधील अधिकाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातात. गुगल किंवा एमआरएसएसी नकाशावर जनगणनेच्या आधारे वॉर्ड रचना केली जाणार आहे. शहरातील कोणतेही क्षेत्र सुटणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. शहराची एकुण लोकसंख्या भागिले पालिकेच्या नगरसेवकांची संख्या या सूत्रानुसार वॉर्डाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे. प्रभागाच्या सीमा निश्चित करताना भौगोलिक रचना सलग ठेवली जाणार आहे. सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे लाइन आदी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन प्रभागांची सीमा ठरविली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एक इमारत. चाळी किंवा घरांचे तसेच, वस्त्यांचे विभाजन दोन वॉर्डात केले जाणार नाही. वार्डांना नाव देणे बंधनकारक नाही. मात्र, आयुक्त वॉर्डाना नाव देऊ शकतात, लवकरात लवकर वार्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगास मेलने पाठविला जाणार आहे.












