- तिकीट दर १० रुपये; सायकलसह प्रवास करण्याचीदेखील मुभा..
- महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘नारीशक्ती’ नावाचा स्वतंत्र डबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी-चिंचवड येथील मेट्रोची प्रवासी सेवा येत्या डिसेंबर अखेर सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी महापालिका ते फुगेवाडी या ७ किलोमीटर अंतरावर प्रवाशांसाठी वाहतूक डिसेंबर अखेर सुरू होणार आहे.
दिल्ली मेट्रोच्या आधारे पुणे मेट्रो मार्गासाठीसाठी तिकिट दर निश्चित केला आहे. पहिल्या एका किलोमीटरसाठी तिकिट दर १० रुपये इतका असणार आहे. त्यानंतर प्रवासाचे टप्पे आणि अंतर जसजसे वाढेल, तसतसा तिकिट दर कमी होईल. मेट्रोमधून महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘नारीशक्ती’ नावाचा स्वतंत्र डबा असणार आहे. मेट्रो स्थानकावर आणि मेट्रो डब्यात सुरक्षिततेच्या हिशोबाने CCTV लावण्यात आली आहे.
मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फुगेवाडी स्थानक ते संत तुकारामनगर स्थानक आणि संत तुकाराननगर स्थानक ते फुगेवाडी स्थानक असा प्रवास केला आहे. या प्रवासा दरम्यान उदवाहकाद्वारे सायकल फुगेवाडीच्या मेट्रो स्थानकाच्या फलाटावर आणण्यात आली. त्यानंतर मेट्रोच्या डब्यात सायकलसह प्रवेश केला गेला. संत तुकारामनगर स्थानकात मेट्रो पोहोचल्यानंतर उदवाहकाद्वारे सायकल बाहेर आणण्यात आल्या. त्याचे प्रात्यक्षिक (गुरुवारी) २६ ऑगस्ट रोजी दाखविण्यात आले आहे. डब्यामध्ये सायकलस्वारांसाठी योग्य ते सूचना फलक आणि मार्गदर्शक फलक लावण्यात येतील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.