- नवीन जागेवर व्यवसाय होईना; पथारीवाल्यांची व्यथा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- बिजलीनगर – स्पाईन मार्गावरील पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या पथारी व्यावसायिकांच्या हातगाड्या जप्त करीत मंगळवारी (दि ३१ ऑगस्ट) अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
बिजलीनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी सुटावी, पदपथ नागरिकांसाठी खुले राहावीत, या उद्देशाने प्रशासनाने काही दिवसांपूर्वी बिजलीनगर – स्पाईन मार्गावरील व्यावसायिकांसाठी रेल विहार सोसायटीच्या मागे मोकळ्या जागेत हॉकर्स झोनची निर्मिती केली होती. तेथे काही दिवस सर्व व्यावसायिक हॉकर्स झोनमध्ये दिलेल्या जागेत व्यवसाय करीत होते. मात्र, येथे व्यवसाय होत नसल्याने काही व्यावसायिकांनी पुन्हा जुन्या जागेवरच आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती.
संबंधित व्यावसायिकांना तात्पुरत्या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित होण्यासाठी वारंवार सांगितले होते. काही व्यावसायिक स्थलांतरित झाले तर काही व्यावसायिक पुन्हा जुन्या ठिकाणी आले होते. त्यांना स्थलांतरित होण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरीसुद्धा ते स्थलांतरित न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सर्व व्यावसायिकांनी त्यांना नेमून दिलेल्या तात्पुरत्या हॉकर्स झोनमध्येच आपला व्यवसाय करावा. त्यांना नवीन जागेत सर्व सोयी सुविधा प्रशासन पुरविणार आहे, अशी माहिती ब प्रभाग क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांनी दिली.












