- बनावट गुटख्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२१) :- मावळातील वडगाव हद्दीत बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र साधनसामग्री, चारचाकी असा एकूण ११ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच एकाला रंगेहाथ पकडले.
श्रीकांत बाळू चांदेकर (वय ३२ रा.ढोरे वाडा, वडगाव मावळ) याला अटक केली आहे. सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे करत आहेत. यात आणखी काहीजण सामील असून बनावट गुटख्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास असल्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.