- निवडणूक आयोगाकडून गणेशोत्सवात मतदार जनजागृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असले तरी घरगुती पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे. घरच्या गणपतीसाठी मोठी तयारी करून आकर्षक सजावट केली जाते.
या माध्यमातून नवमतदार नोंदणी व मताधिकाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. निवडणूक विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गणेशाचे शुक्रवारी (दि. १०) आगमन होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदान करणे हा १८ वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी १८ वर्षावरील नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंद करणे व मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून जनजागृती करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव सजावटीतून जनजागृती करता येऊ शकते. गणेशमंडळांच्या मंडपात आणि ऑनलाई पद्धतीने ही जनजागृती केली जाणा आहे. निवडणूक आयोगाच्य निर्देशानुसार स्पर्धेचे आयोजन केलं आहे.
शहरातील चिंचवड, पिंपरी, भोसरी या तीनही मतदारसंघात हा उपक्रम आयोजिला आहे. पथनाट्य, जिवंत, चल किंवा स्थिर देखावे, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य, कविता, पोस्टर, बॅनर, व्यंगचित्र आदी विषयांवर थेट किंवा ऑनलाईन पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करता येऊ शकते. घरगुती गणपती तसेच सार्वजनिक मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. तसेच स्पर्धेसाठीचे साहित्य निवडणूक कार्यालयाकडून प्रमाणित करून घ्यावे, असे आवाहन अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी केले.