- व्यक्त होता येत नसल्यामुळे नगरसेवक अडचणीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- कोरोना संसर्गामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेची सोमवारी (दि. २०) होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. निमयांवर बोट ठेवून सभा ऑफलाइन न घेता सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या मागणीस वाटाण्याचा अक्षता दाखविल्या आहेत.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या ३ जुलै २०२० व २८ जून २०२१ च्या पत्रानुसार पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येत आहे. या सभेत विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप सातत्याने करण्यात आला आहे. तसेच, पालिकेच्या निवडणुकीस ६ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे प्रभागांतील कामे मार्गी लावण्यासाठी व विविध मुद्दे उपस्थित करण्यासाठी ऑफलाइन सभा आयोजित करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
त्या मागणीसाठी मागील सभेनंतर विरोधकांनी महापौर उषा ढोरे यांना घेरावही घातला होता. त्यामुळे पुढील सभा ऑफलाइन होईल, अशी अपेक्षा विरोधकांना होती. मात्र, शासनाच्या नियमानुसार सभा ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे. परिणामी, विरोधकांना सभेत चर्चा करू दिली जाणार नाही, हे स्पष्ट होत आहे.


















